Ad will apear here
Next
एकटेपणा आणि एकांत


एकटेपणा आणि एकांत... वरवर पाहायला गेलं तर सारखेच वाटतील अशी फसगत करणारे हे दोन शब्द. एकटेपणा आणि एकांत! पण यात जमीन अस्मानचा फरक आहे. एकटेपणा म्हणजे जणू या विश्वातील सर्वांत मोठी शिक्षा आहे. आणि एकांत म्हणजे विश्वातील सर्वांत मोठे वरदान आहे.

चमकलात ना?

बारकाईने विचार करू या, मग फरक कळेल. एकटेपणामध्ये पाहा, नेहमीच जिवाची उलघाल आहे, तर एकांतामध्ये आराम आहे.

एकटेपणामध्ये घाबरणं आहे, तर एकांतामध्ये शांती आहे.

जोपर्यंत आपली नजर ‘बाहेरच्या’ विश्वात, गर्दीत फिरत असते, तोपर्यंत आपल्याला एकटेपणा जास्त जाणवतो. हे सत्य आहे; मात्र तीच नजर (म्हणजे दृष्टी) आपल्या आतमध्ये, स्वतःमध्ये डोकावून पाहायला लागते, तेव्हा आपल्याला एकांताचा सुखद अनुभव येतो.

... आणि मग जाणवायला लागतं, की हे आयुष्य म्हणजे अजून वेगळं काही नाही, तर एकटेपणाकडून एकांताकडे आपल्याला घेऊन जाणारा प्रवास आहे.... जणू कोलाहलातून शांततेकडे निघालेली ती एक यात्रा आहे.

... आणि गंमत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत चालणाऱ्या या प्रवासात, यात्रेत ‘रस्तादेखील आपणच असतो’; ‘प्रवासी पण आपणच असतो’ आणि ‘अंतिम स्टेशन, म्हणजे ध्येयदेखील आपणच असतो.’

मग आता आपणच ठरवायला हवं, की आपल्याला जर मानसिक शांतता हवी असेल, तर आणि एकटेपणा नको असेल, तर स्वतःमध्ये गेलं पाहिजे. आपल्या मनात डोकावलं पाहिजे. आपल्या इच्छा काय आहेत हे हृदय अनेक वेळा सांगतं, आपण त्याकडे काणाडोळा करतो. अन् शांतता गमावून बसतो. ते नको असेल, तर स्वतःमध्ये जायला हवं. हृदयाचं ऐकायला हवं. (भले दिल लेफ्ट की तरफ होता है, लेकिन उसका मशवरा राइट होता है।)

सध्या लॉकडाउनच्या काळात बाहेर पडायला मनाई असेल, पण स्वतःमध्ये ‘आतमध्ये’ जायला कुणी अडवलं नाहीये. या निमित्ताने जरा ‘आत’ डोकावू या, स्वतःला शोधू या अन् एकटेपणा मागे टाकून एकांत अनुभवू या. मानलं तर सगळेच आपले असतात. मित्र, नातेवाईक, गणगोतही!

... मात्र त्या गर्दीत आपण हरवून जात असू, तर एका क्षणी नक्कीच ‘एकटेपणा’ जास्त जाणवायला लागेल; पण गर्दीतून थोडं बाहेर येऊन स्वतःमध्ये हरवून जाण्याचं ठरवलं, तर ‘एकांत’ तुमची वाट पाहत असतो, जिथं तुमच्या मनाचे तुम्ही राजे असता. कारण एकटेपणाकडून एकांताकडे घेऊन जाणारा तो जणू तिमिरातुन तेजाकडे नेणारा उत्साही प्रकाश असतो.

विचार करा! पुन्हा वाचा. मग नक्की अर्थ उमजेल अन् मस्तपैकी एकांताचा सुखद अनुभव तुम्ही घ्याल.

- धनंजय देशपांडे (डीडी)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZNPCM
Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language